Sunday, 26 June 2016

ऐसा स्मरणीय युगे युगे ! लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब..!

"राजकारणातील गुलमोहर गोपीनाथराव मुंडेसाहेब" उसतोड मजूराचा मुलगा, नाथ्रा ते दिल्ली असा दैदिप्यमान डोळे दिपवणारा प्रवास करणारा, तब्बल तेहतीस साखर कारखाने उभे करून ते सक्षमपणे चालवणारा, शिक्षण क्षेत्रात सामान्य माणसाला पाठबळ देऊन हजारो घर सावरणारा,  बॅन्क क्षेत्रात वैद्यनाथ बॅन्केच्या माध्यमातून जनसामान्यांची अविरत सेवा करणारा, विरोधी पक्षनेता आणि गृहमंत्री कसा असावा हे महाराष्ट्र आणि देशाला दाखवून देणारा..
           एक उत्साह, एक चैतन्य एक आनंद म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेब. ज्यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांची बैठक भारावून जाई असे व्यक्तित्व, जिथे नकाराची घंटा तुटून पडे आणि फक्त होकारच कानावर पडे, असे मंगलमय वातावरण निर्माण करणारं राजबिंड व्यक्तिमत्व म्हणजे गोपीनाथराव मुंडेसाहेब. संघर्ष हेच जिवन असणारे, प्रसंगी बोथट झालेल्या तलवारीला धार लावून लढणारे लढवय्ये म्हणजे गोपीनाथराव मुंडेसाहेब. राज्यातील अनेक ज्वलंत प्रश्नावर मुंडेसाहेबांनी अक्षरशः रान उठवले होते. त्यांनी आपल्या संघर्षाची आणि चळवळीची जी शिदोरी दिली ती महाराष्ट्रातील समाजकारणला आणि राजकारणाला कायमस्वरुपी प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारी ठरेल.
1995 मध्ये शिवनेरी ते शिवतीर्थ अशी पासष्ट दिवस आणि वीस हजार किलोमीटर काढलेली "संघर्ष यात्रा" सत्ता परिवर्तनाची नांदी ठरली. राज्यात युती सरकारच्या रूपाने शिवशाही अवतरली.
            युती सरकार येताच महाराष्ट्राच्या या खमक्या गृहमंत्र्याने राजकारणातील गुन्हेगारी आणि मुंबईतील टोळी युद्धाचे कर्दनकाळ म्हणून अतिमहत्वाची भुमिका निभावली. मुंबईतील गुन्हेगारी जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहराच्या आर्थिक नाड्या विकसित होणार नाहीत हे ओळखून गुन्हेगारांना कडक शासन करण्याचा धोरणात्मक आणि धाडसी निर्णय त्यांनी घेतला. सामाजिक सुव्यवस्था संभाळणा-या पोलिसांचे मनोधैर्य वाढले पाहीजे म्हणून त्यांना नवीन सोयसुविधा सोबतच अधिक अधिकार देण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम म्हणून शिवशाहीच्या काळात पोलीसांनी मुंबई शहरात टोळीयुद्ध करून धुमाकूळ घालणा-या शेकडो गुंडाना कंठस्थान घातले. पोलीस स्टेशन मध्ये ठाण मांडून बसणारा पहिलाच गृहमंत्री असणा-या गोपीनाथराव मुंडे नावाची गुन्हेगारांवर प्रचंड दहशत होती. मुंबई हे शहर शांत करण्याचे श्रेय मुंडेसाहेबांनाच जाते. याकाळात त्यांना अनेकदा हत्येच्या धमक्या आल्या पण त्या धमक्यांना भीक न घालता महाराष्ट्राचा गृहमंत्री म्हणून त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. कुठल्याही गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्याला त्यांनी कधीच राजाश्रय दिला नाही.
         उसतोड मजूराचा मुलगा एक उत्कृष्ट कारखानदार म्हणून वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आशिया खंडात नावारुपाला आला. सहकार चळवळ या विषयाचा गाढा व्यसंग मुंडेसाहेबांना होता. त्यांच्या मते सहकार क्षेत्राद्वारे ख-या अर्थाने परस्परांचा परस्परांच्या सहकार्यातून उत्कर्ष घडून येऊ शकतो तर चळवळीद्वारेच ख-या अर्थाने सबंध समाजाचे समाज प्रबोधन होऊ शकते आणि त्याद्वारेच सामजिक परिवर्तन येऊ शकते या ध्येयाने मुंडेसाहेबांनी सहकारी क्षेत्रातील साखर उद्योगाला नवसंजिवनी मिळवून दिली तर संघर्ष चळवळीद्वारे विविध विषयावर प्रभावी जनजागृती केली त्यामुळे गोपीनाथराव आणि संघर्ष चळवळ हे राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणत एक सुत्र झाले होते. साखर उद्योगाकडे ते साखरसम्राट म्हणून न पाहता उद्योगात शेती, शेतकरी, शेतमजूर आणि कृषी व ग्रमिण विकास दडलेला आहे या भुमिकेतून पहात. राज्यातील साखर उद्योग उस उत्पादक शेतकरी आणि उसतोड मजूर यांच्यात समन्वय साधून हा उद्योग गतीमान केला. राज्यातील दिवाळखोरीत निघालेले सत्तावीस कारखाने त्यांनी स्वतः सक्षमपणे चालवून ते पूर्वस्तरावर आणण्याची किमया मुंडेसाहेबांनी केली. साखर सम्राटांच्या लाॅबीला शह देण्यासाठी राज्यात खाजगी साखर उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. यामुळे साखर सम्राटाच्या जाचातून शेतकरी आणि शेतमजूर मुक्त झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात तेहतीस साखर कारखान्यांची एक नवी फळी उभारली. साखर उद्योगात नवीन तंत्रज्ञानाचा स्विकार केला त्यामुळे अनावश्यक खर्चावर मात करणयात आली. यावरून मुंडे साहेबांचा साखर उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन किती मुलभुत आणि सामूहिक विकासाचा होता हे लक्षात येते.
          वैद्यनाथ बॅन्केचा शाखाविस्तार व्यवसायवृद्धी यामागे मुंडेसाहेबांचे लोकनेतृत्व लपून राहिले नाही. त्यांनी वैद्यनाथ अंतर्गत भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच चाळीस पन्नास बॅन्कांना सहभाग कर्ज योजने अंतर्गत एकत्रीत करून त्यांचे नेतृत्व वैद्यनाथकडे घेतले होते. राज्यातील डबघाईला आलेल्या साखर कारखान्यांना कर्ज मिळवून देण्याचे काम वैद्यनाथच्या माध्यमातून केले. साहेबांच्या सहकार चळवळीमध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावे एवढे ते महत्वाचे काम होते. यामुळे प्रत्येक कारखाण्यामागे दहा हजार लोकांना रोजगार मिळाला आणि त्याचा फायदा शेतक-यांनाही तेवढाच झाला. वैद्यनाथच्या माध्यमातून मुंडेसाहेबांनी आजारी साखर कारखाने ताब्यात घेतले आणि त्यांना बळ देऊन उभे केले.
    शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा..
या विचारांनी प्रेरित असणा-या मुंडेसाहेबांचे शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान आहे. शिक्षण हिच मानवी आणि राष्ट्रीय विकासाची पहिली पायरी आहे ही त्यांची भुमिका होती. त्यांनी माध्यमीक शाळा, उच्च महाविद्यालये, वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये उभी केली तेथे सर्वसामान्य विद्यार्थी घडवले. ज्या कोणाची उच्च शिक्षण घेण्याची परिस्थिती नाही अशा गरीब होतकरू मुला-मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. किती तरी पीढ्या स्वखर्चातून निस्वार्थपणे घडवल्या. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामातंर चळवळीत राजकीयदृष्ट्या मतांच्या वजाबाकीचा विचार न करता सहभाग घेऊन, उपमुख्यमंत्री असताना विद्यापीठात उर्दू भाषेचा पद्व्युत्तर पदवी विभाग सुरू केला. डाॅ. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पिपल्स शिक्षण संस्थेच्या औरंगाबाद येथील महाविद्यालयास भरीव निधी उपलब्ध करून दिला.
          विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असणा-या घटकांनाही विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी मंडल आयोगाच्या अमलबजावणीसाठी त्यांनी खुली भुमिका घेऊन मंडलआयोगाला पाठिंबा दिला. मंडलआयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात यासाठी विधानसभेत केलेले भाषण तसेच लोकसभेत उपनेते म्हणून देशातील ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना कशी अवश्यक आहे या संदर्भात केलेले भाषण कायमस्वरुपी लक्षात राहणारे आहे. लोकसभेत ओबीसी जनगणनेचा मुद्दा ठामपणे मांडून मुंडेसाहेबांनी ईतके वर्षे राष्ट्रीय राजकारणात राहीलेल्या यादवांना जे जमले नाही ते करून दाखवले.
          महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी सर्व जातीधर्माच्या नेत्यांचे वेळोवेळी राजकीय पूनर्वसन केले. अनेकांच्या राजकीय जिवनाची नवीन सुरुवात करून दिली. मोठी पदे उपभोगली म्हणून मुंडेसाहेबांनी कधीच स्वताला उंचीवरचा नेता मानले नाही. संघर्षयात्रा, गोदापरिक्रमा, उपोषण, निदर्शने यासाठी ते नेहमीच रस्त्यावर असायचे आणि रस्त्यावर उतरल्यास तरुण कार्यकर्त्यासारखा तोच जोश, जल्लोष त्यांच्यात दिसायचा. सामान्य जनतेच्या हक्कासाठी लढताना उन असो की पाऊस ते कायम रस्त्यावर दिसायचे. त्यांच्या जाण्याने जमिनीवर पाय ठेवुन जनसामान्यांसाठी आकाशपाताळ एक करणार्‍या नेतृत्वाची  कृष्णविवराएवढी अफाट पोकळी दुष्काळग्रस्त महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी जनतेला जाणवत आहे. त्यांच्या नावाने ऊभारला जाणारा गोपीनाथगड अशा दीनदुबळ्यांच्या जगण्याला आधार देण्याचे साहेबांचे काम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या करत राहील हे नक्की.

अनाथांच्या नाथाला विनम्र अभिवादन..!


 -भावार्थ भागवत दौंड (8655470037)
      महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष 
  अखिल भारतीय युवा परिषद

No comments:

Post a Comment