Monday, 15 August 2016

माझ्या भारत देशातील संपूर्ण नागरिकांना ७० व्या स्वातंत्र्य दिनाच्या हादिंक शुभेच्छा...! वंदे मातरम...!

      स्वातंत्र्य दिवस हा प्रामुख्याने संबधित देशाच्या राजकीय स्वातंत्र्य दिवसास संबोधले जाते. भारताचा स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट १५, १९४७ हा आहे. १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रमुख कार्यक्रम ,नवी दिल्ली येथे लाल किल्याच्या साक्षीने साजरा केला जातो.
       १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते.
        कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज केले.१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली.१५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते.

Sunday, 31 July 2016

मातीतले कोहिनूर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

            लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गांव. अर्थात, त्यांचा जन्म रत्नागिरीचाच. त्यांचे मूळ नाव केशव असे होते. पण, ‘बाळ’ हे टोपण नावच कायम राहिले. त्यांचे वडील गंगाधर पंत हे सुरूवातीला प्राथमिक शिक्षक होते. पुढे ते शिक्षण-निरीक्षक बनले. टिळक १० वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली. त्यामुळे टिळकांचे शिक्षण पुणे येथे झाले.
           सन १८७२ मध्ये टिळक मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. याच कॉलेजातून ते १८७७ मध्ये बी.ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले. पुढे सन १८७९ मध्ये ते एल.एल.बी. च्या वर्गात असतानाच त्यांचा आगरकरांशी परिचय झाला. समान ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोन तरुणांनी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्रोद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहुन घेण्याचा निश्चय केला.
            विष्णूशास्त्री चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १ जानेवारी १८८० रोजी पुणे येथे ‘न्यु इंग्लीश स्कूल’ ची स्थापना केली. पुढे टिळक व आगरकर यांनी इंग्रजी भाषेत ‘मराठा’ (२ जानेवारी १८८१) आणि मराठी भाषेत ‘केसरी’ ४ जानेवारी १८८१ रोजी ही वृत्तपत्रे सुरू केली. आगरकर ‘केसरी’चे तर टिळक ‘मराठा’ चे संपादक बनले. त्यानंतर टिळक व आगरकरांनी २४ ऑक्टोबर १८८४ रोजी पुणे येथे ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ ची स्थापना केली. पुढे एका वर्षाने २ जानेवारी, १८८५ रोजी या संस्थेच्या वतीने ‘फर्ग्युसन कॉलेज’ सुरु करण्यात आले.

Monday, 25 July 2016

ताईसाहेबांना उदंड आयुष्य लाभो !

संघर्षाची तेजस्वी मशाल..

       ना. पंकजाताई महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत कमी वयात आणि वेळेत बहरलेले एक युवा संघर्षशील नेतृत्व.
प्रचंड आत्मविश्वास, धडाकेबाज वक्तृत्व, निर्णयक्षम मंत्री, जनसामान्यांशी जोडलेली आपुलकीची नाळ. या सर्व गोष्टीमुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्या फळीतील विशीष्ठ ओळख प्राप्त झालेले सक्षम महिला नेतृत्व.
          मुंडे-महाजन कुटुंबात जन्म घेतलेल्या पंकजांचं नाव प्रमोदजींनी आपल्या पक्षाच्या चिन्हावरून ठेवलेले. त्याकाळी महाराष्ट्रात कमळ फुलवण्यासाठी मुंडे-महाजनांनी स्वतःला  झोकून दिले होते.
पक्षाला शहरातून वाडी-वस्तीवर पोहचवण्यासाठी गोपीनाथराव मुंडेसाहेबांनी रात्रंदिवस एक केलेला.
           परळी वैजनाथच्या एका सरकारी शाळेत आपले प्राथमीक शिक्षण घेत पंकजाताई मोठ्या होत होत्या. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना औरंगाबादला पाठविण्यात आले परंतू परळी सोडून त्यांचे मन बाहेर लागेना. भेटायला गेलेल्या बाबांच्या गाडीत बसून त्यांनी परळी गाठली. वैजनाथ महाविद्यालयात यांनी आपले पुढील शिक्षण चालू ठेवले. सामान्य आयुष्य जगत असतानाच 1995ला प्रथमच महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे सरकार आले. मुंडेसाहेब उपमुख्यमंत्री झाले आणि मुंडे कुटुंबला नाईलाजाने परळी सोडून मुंबईला रहायला जावे लागले.मुंबई आणि बेंगलोर याठिकाणी पंकजा मुंडेनी उच्चशिक्षण प्राप्त केले. लग्नानंतर आपल्या परिवारासोबत परदेशात स्थाईक झालेल्या पंकजा लवकरच मायदेशी परतल्या. प्रमोदजींचे दुर्दैवी निधन झाल्यावर पक्षात आणि बाहेर एकाकी पडलेल्या मुंडेसाहेबांना आधाराची गरज होती. साहेबांनी ज्या लोकांना बोट धरून राजकारण शिकवले तेच सत्तेसाठी एकापाठोपाठ एक गद्दारी करत विरोधी तंबूत सामील होत होते. पंकजा मुंडेना राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची ईच्छा नसताना जिल्हा परिषद निवडणूकांच्या निमित्ताने 2007 साली त्यांना सक्रीय राजकारणात उतरावे लागले. 2009 साली मुंडेसाहेबांचे लोकसभा निवडणुकीसाठी नाव जाहीर झाले. लोकसभा निवडणुकीत साहेब विक्रमी मतांनी विजयी झाल्याने रिक्त झालेल्या रेणापूर विधानसभा मतदार संघाचे परळी मतदार संघात नव्याने रूपांतर झाले.काही कर्तुत्वहीन बहाद्दर आमदार होण्याचे " हसीन सपने पहात" होते. पण यांच्या रोजच्या पराक्रमांना कार्यकर्ते आणि स्थानिक  लोक प्रचंड वैतागलेले होते. परळीतील बापलेकांनी नाराज केलेल्या सामान्य माणसाची माफी मागुन व नुकसान भरपाई करून वर्षानुवर्षे मुंडेसाहेबांना कोणत्याही निवडणुकांचा प्रचार सुरू करावा लागायचा.
साहजिकच परळी मतदार संघातून पंकजा मुंडेंच्या नावाची मागणी जोर धरू लागली. नाईलाजाने आणि जनतेच्या मागणीने पंकजा मुंडे आमदार झाल्या. आमदार होण्याचे स्वप्न रंगवणा-याला जनतेने विरोध केल्यामुळे साहेबांनी दिलदारपणे मागच्या दाराने आमदार केले.
विरोधी पक्षात असतानाही पंकजा मुंडेनी "हे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे" म्हणत स्वतःला जनसेवेत झोकून दिले....
स्त्रीभ्रुण हत्येत सगळ्यात पुढे असलेल्या बीड जिल्ह्यात त्यांनी कित्येक अनाथ मुलींना दत्तक घेऊन त्यांच पालन पोषण केले. सिंधुताई सपकाळांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. आमदार निधीतुन परळी मतदारसंघात शिरपूर पॅटर्नचे उत्कृष्ट असे बंधारे बांधण्यात आले.तिरस्काराचे राजकारण करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात पंकजाताईंनी घेतलेला जनसेवेचा वसा खुपत होता व परळीकरांवरची पकडही सैल होत होती. शेवटी यांनी आपल्या काकांना धोका दिलाच. सत्ताधारी पक्षाचा आधार घेत हे साहेबांच्या विरोधकांना जाऊन मीळाले आणि साहेबांच्या पानिपताच्या वल्गना करू लागले.
परळीकरांनी घेतलेला निर्णय योग्य ठरला. विरोधकांना न डगमगता मुंडेसाहेबांना आधार देत पंकजाताईंनी आपले कार्य अखंड चालू ठेवले.
    लोकसभा निवडणुकीत मुंडेसाहेबांना शह देण्यासाठी तळागाळातील विरोधक कामाला लागले होते. संपूर्ण महाराष्ट्राची मोदींनी टाकलेली जबाबदारी असल्याने साहेबांना त्यांच्या  मतदार संघातच अडकवून ठेवण्याची रणनिती आखण्यात आली होती. ना.पंकजाताईंनी विरोधकांना सडेतोड उत्तर देत एकटीने खींड लढवली.
बीडचा गड लढवत लढवत झुंजार पंकजांनी थेट बारामतीत गावोगाव पिंजून काढले.बीडची विजयश्री खेचून आणली आणि बारामतीमध्ये लाजीरवाणा विजय विरोधकांच्या घरात पहिल्यांदाच.
     मुंडेसाहेबांच्या आकस्मित जाण्याने जनसामान्यांच्या पायाखालची जमीन सरकली, शोषित, पिडीत दिनदुबळ्या गरिब जनतेचा लोकनाथ गेला. तळागाळातील कार्यकर्त्याचा आधारवड गेला. सैरभैर झालेल्या, कोलमडून पडलेल्या निराश जनतेला आता गरज होती ती कुणाच्या तरी भक्कम आधाराची.
अंत्यविधीला जमलेल्या संतप्त जनतेने आपल्या लढवय्या नेत्याला अखेरचा निरोप देताना आपल्या संतप्त भावनांना वाट करून दिली. सैरभैर झालेल्या जनतेला सावरणारा एक आवाज त्या गर्दीला भेदत लोकांच्या कानावर पडला,तो आवाज शांतता आणि संयम राखण्यासाठी विनवणी करत होता आणि क्षणार्धात जमाव शांत झाला. एका मुलीने आपल्या पित्याला मुखाग्नी देऊन पुरोगामित्वाचा इतिहास रचला.
         जनतेला सावरत "आता रडणार नाही, लढणार आहे" म्हणत पुन्हा एकदा संघर्षाची मशाल पेटवली गेली. विरोधकांना अगदी साहेबांप्रमाणेच टक्कर द्यायला ही रणरागिणी तयार झाली. विखुरलेल्या जनतेला संघर्ष यात्रेच्या रूपाने पुन्हा एकत्र जोडले. या संघर्षकन्येने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पक्षाला सत्तेत नेऊन बसवले.
विरोधक आजही तीतकेच चिंतेत आहेत जितके साहेब असताना असायचे. कुरघोडी करायची कुठलीही संधी ते आजही सोडत नाहीत पण मुंडे-महाजनांचा वारसा त्यांचा तीतक्याच आक्रमकतेने सामना करताना दिसत आहे. आजही मुंडे विरूद्ध सगळे गद्दार आणि धुर्त असाच संघर्ष कायम आहे.
दिवा दिवटा नाही तर लोकनेत्याच्या वंशाला एक संघर्षाची मशाल अविरतपणे पुढे नेत आहे.
              पंकजाताईंनी महाराष्ट्रात राबवलेली "जलयुक्त शिवार योजना" संपूर्ण देशात आदर्श निर्माण करत आहे. सतत दुष्काळाच्या झळा सोसणा-या महाराष्ट्राला जलयुक्त शिवार दुष्काळमुक्त करणार आहे. सगळयात सक्षम आणि लोकप्रीय मंत्री म्हणूण आपली ओळख निर्माण करण्यात पंकजाताई यशस्वी झालेल्या आहेत.
ना.पंकजाताईंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

जलक्रांतीच्या प्रणेत्या नामदार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

लोकनेत्या ताईसाहेब....

           महाराष्ट्रात तसे अनेक नेते आहेत ज्यात महिलाही आहेत पण पुरुष नेत्यांच्या मानाने राज्याच्या प्रमुख नेत्यांमधे गणल्या जानाऱ्या महिला या बोटावर मोजन्यवढ्याच आहेत. त्यात अग्रस्थानि असणारया नेत्या म्हणजे राज्याच्या ग्रामविकास तसेच महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे  या आहेत . सामाजिक कार्य करता करता त्यांच्या ध्यानी मनी नसतानाहि अचानक राजकारणात आलेल्या पंकजा मुंडे या राज्याच्या राजकारणात टिकनार नाहीत असच सर्वाना सुरुवातीला वाटले होते . पण प्रथमतः परळी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत पोचलेल्या पंकजा यांनी अत्यंत कमी कालावधीत आपल्या कामगिरिद्वारे जनमानसात आपले स्थान बळकट केले वडिलांचा वारसा जरी त्यांच्या पाठीशी असला तरी युवा मोर्चाचा माध्यमातून त्यांनी पवारांच्या बालेकिल्ला असलेल्या बारामतिमधे एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वाची चुनुक दाखवून दिली राज्यातील दिग्गज नेतेही पवारांच्या बालेकील्ल्यात त्यांना आव्हान द्यायला 10 वेळेस विचार करुण देखील कधी साधा कार्यक्रम घेवू शकले नाहीत तिथ त्यांनी एल्गार मेळावा घेतला . लेक वाचवा मोहीम ही  यशस्विरित्या राबवून त्यांनी सामाजिक कार्यातही चुनुक दाखवून दिली . लोकसभा निवडणुकीत राज्याची धुरा सांभाळणाऱ्या गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या बिड लोकसभा मतदारसंघाची प्रचाराची धुरा पंकजा यांनी स्वतःच्या खांद्यावर घेवून ती फक्त यशस्वी केलि नाही तर उत्तमरित्या पेलुन दाखवली . लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसातच गोपीनाथ मुंडे यांच निधन झाले आणि सबंध महाराष्ट्रावर काळाने आघात केला , महारष्ट्राचा लोकनेता, शेतकऱ्यांचा कैवारी आणि मुख्यमंत्री हरवला ज्यावेळी स्वतःच्या वडिलांचे छत्र हरवल्यानंतर पंकजा यांना धीर देण्याची गरज असताना अशावेळी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो जनतेला जी सैरभैर झाली होती त्यांना पंकजा यांनी आधार दिला  आणि वडिलांचा वारसा पुढे चालु ठेवण्याचा वसा घेतला आणि विधानसभा निवडणुकी आधी संघर्षयात्रा काढून विधानसभा निवडणुकीत मोलाचा वाटा उचलला . मंत्रीपदि विराजमान होताच ज्या जलसंधारण खात्याला कोणी ओळखत नव्हते त्या खात्याला त्यांनी जलसंपदा खात्यापेक्षा जास्त महत्व प्राप्त करुण दिले . जलयुक्त शिवार योजना त्यांनी यशस्वीरित्या राबवली . वैद्यनाथ बँक, वैद्यनाथ साखर कारखाना असे पारंपारिक गडही तगडे विरोधक असताना जिंकले आणि फक्त सहानुभूति नाही तर झुंज देवून त्या निवडणूक जिंकू शकतात हे सिद्ध करुण दाखवले . जीवनात त्यांना बऱ्याच कठिन पायऱ्या चढायच्या आहेत आणि पंकजा मुंडे त्याही यशस्विपणे पार पाड़तील यात शंका नाही आज त्यांचा वाढदिवस त्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा असच त्यांच्या चांगल्या कामाचा आलेख वाढत जावो हीच ईश्वरचरनि प्रार्थना.

|| ताईसाहेबांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ||

- भावार्थ भागवत दौंड  (प्रदेश उपाध्यक्ष)
       अखिल भारतीय युवा परिषद

Thursday, 30 June 2016

|| जागतिक वृक्ष लागवड दिन ||

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षाचे महत्त्व अधोरेखित आहेत. हे नव्याने सांगणे नको. सध्याच्या काळात जागतिक पातळीवर हवामानातील बदल आणि वैश्विक उष्णतेत होणारी वाढ या संदर्भात मोठ्या प्रमाणात विचार मंथन होत आहे. त्यानुसार होणारी तीव्रता व होणारा परिणाम कमी करण्यासाठी एक प्रयत्न म्हणून शासन पातळीवर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे.
         राज्याचे वित्त व नियोजन तथा वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून, वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनात राज्यात १ जुलै रोजी सर्वत्र २ कोटी वृक्ष लागवड करण्याचा महासंकल्प साकारत आहे.
     वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ (Global Warming), हवामानातील बदल (Climatic changes) याबाबत जागतिकस्तरावर मोठ्या प्रमाणात विचारमंथन सुरू झाले आहे. यांची तीव्रता व परिणामकारकता कमी करण्याचा भाग म्हणून शासनाचे विविध विभाग व जनतेच्या सहभागातून पावसाळ्यात वन महोत्सव कालावधीमध्ये ०१ जुलै २०१६ रोजी, या एकाच दिवशी किमान ०२ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. हा केवळ शासकीय कार्यक्रम नसून ही एक लोकचळवळ आहे. भावी पिढीला प्राणवायू जर हवा असेल तर आजच्या प्रत्येक मनुष्याने एक तरी वृक्ष लावलाच पाहिजे. अन्यथा भविष्यात होणाऱ्या ऱ्हासास आपण जबाबदार आहोत हे विसरुन चालणार नाही. आज आपण वृक्ष लागवड केली तरच भावी पिढी आपणांस माफ करेल. राज्याच्या ज्या भागात कमी वृक्ष आहेत तेथील पाण्याचे दुर्भिक्ष आपण पाहिलेले आहे, अनुभवलेले आहे हे नव्याने सांगणे नको.

वृक्ष लागवडीसाठी झाडे - वनमहोत्सवातील वृक्ष लागवड करण्यास वने व सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटीकांमधून सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येईल. याचा लाभ सर्व संबंधित विभागांनी घ्यावा. जिथे अडचण असेल तिथे वन व सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत रोपे देण्याचा प्रयत्नही होईल. साधारणत: सहजरित्या व कमी पाण्यावर जगणारी, लवकर वाढ असणारी झाडे लावणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने आंबा, चिंच, आवळा, जांभूळ, करंज, कवठ, काजू, फणस, वड, पिंपळ, कडूलिंब, पळस, क्यॉशिया, रेन ट्री, गुलमोहर, चाफा ही झाडे अपेक्षित आहेत.

देखभाल व संगोपन - या मोहिमेंतर्गत लागवड केलेल्या झाडांचे, रोपांचे जिवंत राहण्याचे प्रमाण किमान 80% ते 90% पेक्षा अधिक राहावे यासाठी देखील शासनाने काळजी घेतली आहे. किमान पहिल्या 4 वर्षापर्यंतच्या खबरदारीसाठी असलेल्या कामाचे सनियंत्रण, जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर गठीत केलेल्या समित्याद्वारे होईल. तसेच जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावरील समित्या पालकमंत्री, संबंधित तालुक्याचे आमदार आणि ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखालील समित्या वृक्षारोपणाच्या संरक्षणासाठी त्यांच्या क्षेत्रामधील जनतेला आवाहन करुन त्यांना या कार्यक्रमात सामावून घेण्याबाबत सहकार्य मिळविले जाईल. यासाठी देखील सर्व संबंधितांनी पुढाकार घ्यावा. लागवड झालेल्या झाडांचे संगोपन करावे व ही झाडे जगवावी. महत्त्वाकांक्षी अशा या उपक्रमात राज्य शासनाच्या महसूल, पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्य व्यवसाय, नगरविकास, सहकार व पणन, सांस्कृतिक कार्य, उच्च व तंत्र शिक्षण, गृह, परिवहन, उद्योग, ऊर्जा, विधी व न्याय, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, जलसंधारण, शालेय शिक्षण व क्रीडा, आदिवासी विकास, जलसंपदा, सामाजिक न्याय, कृषी या 20 विभागांना सहभागी करुन घेण्यात आले आहे. या विभागामार्फत अत्यंत नियोजनबध्दरितीने वृक्ष लागवडीसाठीचे कार्य सुरु असून त्यावर दैनंदिन सनियंत्रण केले जात आहे. जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी स्वत: या उपक्रमावर लक्ष ठेऊन आहेत. उपक्रम अधिक यशस्वी होण्यासाठी लोकसहभागाची अत्यंत आवश्यकता आहे. या कार्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबर स्वयंसेवी व अशासकीय संस्था, खाजगी उद्योजक, उद्योजकता सामाजिक दायित्व (CSR) अंतर्गत उपक्रम तसेच सहकारी संस्था, विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारी मंडळे व संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महत्त्वाचे म्हणजे लोकप्रतिनिधीचा यातील सक्रिय सहभाग त्यामुळेच हे शिवधनुष्य सहज उचलले जाऊ शकेल असे वाटते. या सर्वांच्या मदतीने हे कार्य सुरु आहे.

          राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील माप दंडानुसार भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्रावर वृक्षाच्छादन/वनीकरण असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य हे देशातील प्रगतीशील आणि विकासामध्ये अग्रगण्य राज्य आहे. राज्यातील वृक्ष आवरणाचे प्रमाण सर्वसाधारणपणे 20% आहे. जागतिक तापमानात होत असलेली वाढ, वातावरणातील बदल, बदललेले निसर्ग आणि ऋतुचक्र, अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी किंवा दुष्काळ या माध्यमातून गेल्या काही वर्षात निसर्ग आपल्याला जाणीव करुन देत आहे. पर्यावरणाचे असंतुलन, असमतोल, वाढते प्रदूषण आणि त्यातून होत असलेले पर्यावरणीय बदल ही यामागील महत्त्वाची कारणे आहेत. मानवी जीवनास या पर्यावरणीय बदलास सामोरे जावे लागत आहे याचे भान ठेवावे. त्यामुळे या निमित्ताने एकच आवाहन करावेसे वाटते की, राज्यशासन राबवित असलेल्या 2 कोटी वृक्ष लागवडीच्या या उपक्रमात राज्यातील प्रत्येकाने आपापल्या परीने सहभागी व्हावे आणि पर्यावरणाच्या महत्त्वपूर्ण अशा या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा.

|| आता एकच लक्ष 1 जुलैला 2 कोटी वृक्ष ||

   -भावार्थ भागवत दौंड
      महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष
  अखिल भारतीय युवा परिषद

Sunday, 26 June 2016

ऐसा स्मरणीय युगे युगे ! लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब..!

"राजकारणातील गुलमोहर गोपीनाथराव मुंडेसाहेब" उसतोड मजूराचा मुलगा, नाथ्रा ते दिल्ली असा दैदिप्यमान डोळे दिपवणारा प्रवास करणारा, तब्बल तेहतीस साखर कारखाने उभे करून ते सक्षमपणे चालवणारा, शिक्षण क्षेत्रात सामान्य माणसाला पाठबळ देऊन हजारो घर सावरणारा,  बॅन्क क्षेत्रात वैद्यनाथ बॅन्केच्या माध्यमातून जनसामान्यांची अविरत सेवा करणारा, विरोधी पक्षनेता आणि गृहमंत्री कसा असावा हे महाराष्ट्र आणि देशाला दाखवून देणारा..
           एक उत्साह, एक चैतन्य एक आनंद म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेब. ज्यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांची बैठक भारावून जाई असे व्यक्तित्व, जिथे नकाराची घंटा तुटून पडे आणि फक्त होकारच कानावर पडे, असे मंगलमय वातावरण निर्माण करणारं राजबिंड व्यक्तिमत्व म्हणजे गोपीनाथराव मुंडेसाहेब. संघर्ष हेच जिवन असणारे, प्रसंगी बोथट झालेल्या तलवारीला धार लावून लढणारे लढवय्ये म्हणजे गोपीनाथराव मुंडेसाहेब. राज्यातील अनेक ज्वलंत प्रश्नावर मुंडेसाहेबांनी अक्षरशः रान उठवले होते. त्यांनी आपल्या संघर्षाची आणि चळवळीची जी शिदोरी दिली ती महाराष्ट्रातील समाजकारणला आणि राजकारणाला कायमस्वरुपी प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारी ठरेल.
1995 मध्ये शिवनेरी ते शिवतीर्थ अशी पासष्ट दिवस आणि वीस हजार किलोमीटर काढलेली "संघर्ष यात्रा" सत्ता परिवर्तनाची नांदी ठरली. राज्यात युती सरकारच्या रूपाने शिवशाही अवतरली.
            युती सरकार येताच महाराष्ट्राच्या या खमक्या गृहमंत्र्याने राजकारणातील गुन्हेगारी आणि मुंबईतील टोळी युद्धाचे कर्दनकाळ म्हणून अतिमहत्वाची भुमिका निभावली. मुंबईतील गुन्हेगारी जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहराच्या आर्थिक नाड्या विकसित होणार नाहीत हे ओळखून गुन्हेगारांना कडक शासन करण्याचा धोरणात्मक आणि धाडसी निर्णय त्यांनी घेतला. सामाजिक सुव्यवस्था संभाळणा-या पोलिसांचे मनोधैर्य वाढले पाहीजे म्हणून त्यांना नवीन सोयसुविधा सोबतच अधिक अधिकार देण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम म्हणून शिवशाहीच्या काळात पोलीसांनी मुंबई शहरात टोळीयुद्ध करून धुमाकूळ घालणा-या शेकडो गुंडाना कंठस्थान घातले. पोलीस स्टेशन मध्ये ठाण मांडून बसणारा पहिलाच गृहमंत्री असणा-या गोपीनाथराव मुंडे नावाची गुन्हेगारांवर प्रचंड दहशत होती. मुंबई हे शहर शांत करण्याचे श्रेय मुंडेसाहेबांनाच जाते. याकाळात त्यांना अनेकदा हत्येच्या धमक्या आल्या पण त्या धमक्यांना भीक न घालता महाराष्ट्राचा गृहमंत्री म्हणून त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. कुठल्याही गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्याला त्यांनी कधीच राजाश्रय दिला नाही.
         उसतोड मजूराचा मुलगा एक उत्कृष्ट कारखानदार म्हणून वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आशिया खंडात नावारुपाला आला. सहकार चळवळ या विषयाचा गाढा व्यसंग मुंडेसाहेबांना होता. त्यांच्या मते सहकार क्षेत्राद्वारे ख-या अर्थाने परस्परांचा परस्परांच्या सहकार्यातून उत्कर्ष घडून येऊ शकतो तर चळवळीद्वारेच ख-या अर्थाने सबंध समाजाचे समाज प्रबोधन होऊ शकते आणि त्याद्वारेच सामजिक परिवर्तन येऊ शकते या ध्येयाने मुंडेसाहेबांनी सहकारी क्षेत्रातील साखर उद्योगाला नवसंजिवनी मिळवून दिली तर संघर्ष चळवळीद्वारे विविध विषयावर प्रभावी जनजागृती केली त्यामुळे गोपीनाथराव आणि संघर्ष चळवळ हे राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणत एक सुत्र झाले होते. साखर उद्योगाकडे ते साखरसम्राट म्हणून न पाहता उद्योगात शेती, शेतकरी, शेतमजूर आणि कृषी व ग्रमिण विकास दडलेला आहे या भुमिकेतून पहात. राज्यातील साखर उद्योग उस उत्पादक शेतकरी आणि उसतोड मजूर यांच्यात समन्वय साधून हा उद्योग गतीमान केला. राज्यातील दिवाळखोरीत निघालेले सत्तावीस कारखाने त्यांनी स्वतः सक्षमपणे चालवून ते पूर्वस्तरावर आणण्याची किमया मुंडेसाहेबांनी केली. साखर सम्राटांच्या लाॅबीला शह देण्यासाठी राज्यात खाजगी साखर उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. यामुळे साखर सम्राटाच्या जाचातून शेतकरी आणि शेतमजूर मुक्त झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात तेहतीस साखर कारखान्यांची एक नवी फळी उभारली. साखर उद्योगात नवीन तंत्रज्ञानाचा स्विकार केला त्यामुळे अनावश्यक खर्चावर मात करणयात आली. यावरून मुंडे साहेबांचा साखर उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन किती मुलभुत आणि सामूहिक विकासाचा होता हे लक्षात येते.
          वैद्यनाथ बॅन्केचा शाखाविस्तार व्यवसायवृद्धी यामागे मुंडेसाहेबांचे लोकनेतृत्व लपून राहिले नाही. त्यांनी वैद्यनाथ अंतर्गत भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच चाळीस पन्नास बॅन्कांना सहभाग कर्ज योजने अंतर्गत एकत्रीत करून त्यांचे नेतृत्व वैद्यनाथकडे घेतले होते. राज्यातील डबघाईला आलेल्या साखर कारखान्यांना कर्ज मिळवून देण्याचे काम वैद्यनाथच्या माध्यमातून केले. साहेबांच्या सहकार चळवळीमध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावे एवढे ते महत्वाचे काम होते. यामुळे प्रत्येक कारखाण्यामागे दहा हजार लोकांना रोजगार मिळाला आणि त्याचा फायदा शेतक-यांनाही तेवढाच झाला. वैद्यनाथच्या माध्यमातून मुंडेसाहेबांनी आजारी साखर कारखाने ताब्यात घेतले आणि त्यांना बळ देऊन उभे केले.
    शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा..
या विचारांनी प्रेरित असणा-या मुंडेसाहेबांचे शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान आहे. शिक्षण हिच मानवी आणि राष्ट्रीय विकासाची पहिली पायरी आहे ही त्यांची भुमिका होती. त्यांनी माध्यमीक शाळा, उच्च महाविद्यालये, वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये उभी केली तेथे सर्वसामान्य विद्यार्थी घडवले. ज्या कोणाची उच्च शिक्षण घेण्याची परिस्थिती नाही अशा गरीब होतकरू मुला-मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. किती तरी पीढ्या स्वखर्चातून निस्वार्थपणे घडवल्या. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामातंर चळवळीत राजकीयदृष्ट्या मतांच्या वजाबाकीचा विचार न करता सहभाग घेऊन, उपमुख्यमंत्री असताना विद्यापीठात उर्दू भाषेचा पद्व्युत्तर पदवी विभाग सुरू केला. डाॅ. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पिपल्स शिक्षण संस्थेच्या औरंगाबाद येथील महाविद्यालयास भरीव निधी उपलब्ध करून दिला.
          विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असणा-या घटकांनाही विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी मंडल आयोगाच्या अमलबजावणीसाठी त्यांनी खुली भुमिका घेऊन मंडलआयोगाला पाठिंबा दिला. मंडलआयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात यासाठी विधानसभेत केलेले भाषण तसेच लोकसभेत उपनेते म्हणून देशातील ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना कशी अवश्यक आहे या संदर्भात केलेले भाषण कायमस्वरुपी लक्षात राहणारे आहे. लोकसभेत ओबीसी जनगणनेचा मुद्दा ठामपणे मांडून मुंडेसाहेबांनी ईतके वर्षे राष्ट्रीय राजकारणात राहीलेल्या यादवांना जे जमले नाही ते करून दाखवले.
          महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी सर्व जातीधर्माच्या नेत्यांचे वेळोवेळी राजकीय पूनर्वसन केले. अनेकांच्या राजकीय जिवनाची नवीन सुरुवात करून दिली. मोठी पदे उपभोगली म्हणून मुंडेसाहेबांनी कधीच स्वताला उंचीवरचा नेता मानले नाही. संघर्षयात्रा, गोदापरिक्रमा, उपोषण, निदर्शने यासाठी ते नेहमीच रस्त्यावर असायचे आणि रस्त्यावर उतरल्यास तरुण कार्यकर्त्यासारखा तोच जोश, जल्लोष त्यांच्यात दिसायचा. सामान्य जनतेच्या हक्कासाठी लढताना उन असो की पाऊस ते कायम रस्त्यावर दिसायचे. त्यांच्या जाण्याने जमिनीवर पाय ठेवुन जनसामान्यांसाठी आकाशपाताळ एक करणार्‍या नेतृत्वाची  कृष्णविवराएवढी अफाट पोकळी दुष्काळग्रस्त महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी जनतेला जाणवत आहे. त्यांच्या नावाने ऊभारला जाणारा गोपीनाथगड अशा दीनदुबळ्यांच्या जगण्याला आधार देण्याचे साहेबांचे काम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या करत राहील हे नक्की.

अनाथांच्या नाथाला विनम्र अभिवादन..!


 -भावार्थ भागवत दौंड (8655470037)
      महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष 
  अखिल भारतीय युवा परिषद